समर्पकपणे सांगता येईल. भारतातील प्रमुख प्राच्यविद्या संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. एशियाटिक सोसायटी, कोलकत्ता (१७८४), द गव्हर्नमेंट संस्कृत कॉलेज, कोलकत्ता (१८२४), अद्यर लायब्ररी ॲन्ड रिसर्च सेंटर, चेन्नई (१८८६), ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट, म्हैसूर (१८९१), विश्वेश्वरानंद विश्वबंधू इन्स्टिट्यूट ऑफ संस्कृत ॲन्ड इंडोलॉजिकल स्टडीज, पंजाब (१९०३), मद्रास संस्कृत कॉलेज, (१९०५), मिश्रीक सोसायटी, बेंगलोर (१९०९), ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट अॅन्ड मॅन्युस्क्रिप्ट लायब्ररी, त्रिवेंद्रम (१९११), संस्कृत साहित्य परिषद, कोलकत्ता (१९९६), भांडारकर ओरिएन्टल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे (१९१७), ओरिएन्टल इन्स्टिट्यूट, बडोदा (१९२७), संस्कृत अकादमी, चेन्नई (१९२७) इ.
बडोद्यातील प्राच्यविद्या संशोधनाचा आरंभ
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भारतातील प्राच्यविद्येच्या प्रसारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आपल्या प्राचीन संस्कृतीचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्राचीन ग्रंथाच्या हस्तलिखित पोथ्यांचा संग्रह, संरक्षण आणि संपादन करण्याचे महत्त्व महाराजांनी जाणले होते. १८८७ च्या पहिल्या युरोप दौऱ्यात असताना सयाजीरावांनी दुर्मिळ संस्कृत हस्तलिखिते जमा करण्याच्या सूचना पत्र लिहून दिवाणांना दिल्या होत्या. यावरून प्राचीन ग्रंथांचे संवर्धन करण्याची दृष्टी अगदी राज्यकारभार हाती