पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या सर्व प्रयत्नातून १९३३ पर्यंत १३,९८४ हस्तलिखितांचा संग्रह बडोदा प्राच्यविद्या संस्थेकडे उपलब्ध झाला. हा संग्रह भारतातील सर्वोत्तम संग्रहांपैकी एक मानला जातो. दागिने पुन्हा बनविता येतात मात्र एखादी पोथी नष्ट झाली म्हणजे त्यातील ज्ञानच संपुष्टात येते. त्यामुळे पोथ्या या स्वतःच्या आभूषणांपेक्षा अधिक महत्त्वाच्या आहेत असे महाराज मानत. म्हणूनच महाराजांनी स्वतःचे दागिने ठेवण्याच्या लंडनच्या कंपनीने तयार केलेल्या अग्नी संरक्षक कवच असलेल्या अतिशय मोठ्या तिजोऱ्या हस्तलिखित पोथ्यांचे जतन करण्यासाठी प्राच्यविद्या मंदिरासाठी दिल्या होत्या.

 सयाजीराव महाराजांनी आपल्या साक्षर जनतेला ज्ञानी बनविण्याच्या उद्देशाने आपल्या ६४ वर्षांच्या कारकीर्दीत विविध ग्रंथमाला सुरू केल्या. त्यातील काही प्रमुख ग्रंथमाला पुढीलप्रमाणे होत्या. बाल ज्ञानमाला, बाल संगीतमाला, ज्ञानमंजूषा, प्राचीन काव्यमाला, राष्ट्रकथामाला, महाराष्ट्र ग्रंथमाला, पाकशास्त्रमाला, क्रीडामाला इ. या सर्व ग्रंथ मालांच्या माध्यमातून आपल्या जनतेला बुद्धिवादी आणि विज्ञाननिष्ठ नागरिक बनविण्यासाठी सयाजीरावांनी अविरत प्रयत्न केले. या मालांव्यतिरिक्त काही ग्रंथ स्वतंत्रपणे प्रकाशित केले होते. त्याचबरोबर संस्कृत संशोधनाशी संबंधित हिंदू-धर्म-शास्त्रमाला (Hindu Law Series) आणि २४ खंडात असणारी पाटण हस्तलिखिते भाषांतरमाला दोन विशेष ग्रंथमाला देखील होत्या.

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / १०