पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

रु. चे अनुदान दिले होते. त्याचप्रमाणे या परिषदेचा अहवाल छापण्यासाठी स्वतंत्रपणे ३ हजार रु. दिले होते. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम २ कोटी ४८ लाख ४० हजार रु. इतकी होते. आज लोकांना अविश्वसनीय वाटेल असे हे दातृत्व आहे. ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचा सयाजीरावांचा ध्यास यातून प्रतीत होतो. या परिषदेच्या पहिल्या दिवशीचा कार्यक्रम संपल्यावर दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी विविध विषयांच्या शाखासभा भरत होत्या, त्यांना हजर राहून महाराजांनी आपली ज्ञानलालसा व्यक्त केली. या शाखांत पुराण संशोधन, वैदिक संस्कृत, मानवंशशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास, तुलनात्मक भाषाशास्त्र, ललितकला, अवेस्ता, अरेबिक, फारशी, गुजराथी, मराठी व हिंदी या अवाचीन भाषा इत्यादी विभाग होते. यावरून या परिषदेच्या व्यापक स्वरूपाची कल्पना येऊ शकेल.

 याशिवाय अनेक विषयांवरील व्याख्याने, संस्कृतांतून चर्चा करणारी पंडित परिषद, संस्कृत नाटकाचा प्रयोग, उर्दू काव्यरचनेची चढाओढ करणारा मुशाहिराचा समारंभ वगैरे अनेक उद्बोधक व आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यापैकी बऱ्याच कार्यक्रमांना स्वत: महाराजांनी उपस्थिती लावून आपली विद्याभिरुची व्यक्त केली.

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २६