पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



दृष्टिक्षेत्र अधिक व्यापक करा आणि ऐतिहासिकदृष्ट्या विचार करण्यास शिका, थोडक्यात सांगावयाचे तर मी त्यांना असे सुचविले की, तुम्ही आधुनिक बना व समाजाचे तुम्ही उपयुक्त घटक आहात, असे सिद्ध करा."
 ज्ञान, विज्ञान आणि संस्कृती संवर्धन या क्षेत्रातील भारतीय मानदंड म्हणजे महाराज होते. अशा कामाला सक्रिय सहभागाबरोबर नैतिक पाठिबा आणि भक्कम आर्थिक साहाय्य देण्याचे त्यांचे धोरण जगप्रसिद्ध होते. यामुळे या परिषदेचे अध्यक्ष प्राच्यविद्यापंडित डॉ. काशीप्रसाद जयस्वाल यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात महाराजांना राजा भोजची उपमा दिली आहे. जयस्वाल म्हणतात, “आजचे अधिवेशन महाराज गायकवाड, अथवा अर्वाचीन काळचे राजा भोज यांच्या उदार आश्रयाखाली भरत आहे, ही गोष्ट इतिहासात चिरस्मरणीय अशीच मानली जाईल. भोज राजाच्या राज्याप्रमाणेच महाराजांच्या राज्यातही अशिक्षित मनुष्य क्वचितच आढळेल. भोज राजाने प्राचीन हिंदू वाङ्मयातील अमूल्य ग्रंथ तत्कालीन लोकांना आपल्या प्रबंधांच्या व कोश ग्रंथांच्या द्वारा उपलब्ध करून दिले, तेच कार्य महाराजही आपल्या 'गायकवाड ओरिएंटल सिरिज' मधील ग्रंथांच्याद्वारे करीत आहेत.”

 जयस्वाल यांनी महाराजांबद्दल काढलेले वरील उद्गार ही स्तुतीसुमने नसून महाराजांनी या क्षेत्रात केलेल्या अद्वितीय कामाचा गौरव आहे. या परिषदेसाठी महाराजांनी १० हजार

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २५