पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीराव आणि भांडारकर प्राच्यविद्यामंदिर
 महाराष्ट्रातील विद्वानांच्या नव्या पिढीला पुण्याचे भांडारकर प्राच्यविद्यामंदिर परिचित आहे. भारतातील अग्रगण्य आणि आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या या संस्थेच्या पायाभरणीत सयाजीरावांचे आर्थिक आणि बौद्धिक योगदान आहे हे महाराष्ट्राला अपरिचित आहे. १९१७ मध्ये भांडारकर प्राच्यविद्या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचे संकल्पक डॉ. श्रीपाद बेलवलकर हे ही संस्था स्थापन करण्याची कल्पना घेऊन १९१६ मध्ये महाराजांना भेटले होते. या भेटीमागचे कारण म्हणजे आर्थिक साहाय्य मिळावे हेच होते.

 यावेळी महाराजांशी झालेल्या चर्चेत बडोद्याच्या प्राच्यविद्या संस्थेच्या तयारीची बेलवलकरांना कल्पना आली. तसेच बडोद्यात यादृष्टीने झालेले काम त्यांना पाहता आले. यासंदर्भातील हकीकत सांगताना बेलवलकर म्हणतात, " निबंधाच्या प्रारंभी निर्दिष्ट केलेल्या कारणाकरित भांडारकर प्राच्यविद्या संशोधनमंदिराला जरी महाराजांनी केवळ एक हजार रुपयांचीच देणगी दिली असली तरी वरील कार्याला संस्थानांतून दरसाल रुपये ५०० ची मदत आजतागाईत होत आहे. त्याचप्रमाणे दुसरे उदाहरण म्हणजे हिंदुस्थानात दर दोन वर्षांनी भरणारी “ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स्" चीं अधिवेशने ही होत. संस्थानांतून अधिवेशनास नियमित देणगी देण्यात येते व पुढ म्हणजे सातवे अधिवेशन तर खुद्द बडोद्यातच भरवावयाचे आहे.

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / २७