Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'गायकवाड ओरिएन्टल सिरिज'
 सप्टेंबर १९९४ मध्ये संस्थानातर्फे आदेश काढून सी. डी. दलाल यांच्या नेतृत्वाखाली पाटण आणि इतर जैन भांडारांचे सर्वेक्षण करून घेतले. सी. डी. दलाल यांनी दिलेल्या अहवालावरून तेथे सापडलेल्या दुर्मिळ कागदपत्रांचे प्रकाशन करण्यासाठी 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज' या विशेष मालेची सुरुवात १९१५ मध्ये केली. त्यानुसार ही माला पाश्चात्य संशोधन पध्दती आणि प्रकाशन संहितेनुसार हस्तलिखितांच्या संशोधित आवृत् प्रकाशित करू लागली. १९१६ मध्ये या मालेतील राजशेखर कृत 'काव्यमीमांसा' हा पहिला ग्रंथ प्रकाशित झाला. या ग्रंथाची १९२४ - दुसरी आवृत्ती (१००० प्रती) आणि १९३६ - तिसरी आवृत्ती (१००० प्रती) निघाली. पाटण आणि जेसलमेर वगळता संपूर्ण भारत आणि परदेशातसुद्धा त्यावेळी 'काव्यमीमांसा' हा ग्रंथ उपलब्ध नव्हता. या ग्रंथाची गायकवाड ओरिएन्टल सिरिजमध्ये प्रकाशित झालेली जगातील एकमेव प्रत ठरली. ‘काव्यमीमांसा” या ग्रंथाच्या सुरुवातीस पाटण येथे सापडलेले १३ व्या शतकातील 'काव्यमीमांसा' चे ताडपत्र समाविष्ट करण्यात आले आहे. यावरून आपल्याला या ग्रंथाचे अनन्य स्थान सहज लक्षात येते.

 सुरुवातीला या मालेत प्रत्येक ग्रंथाच्या फक्त ५०० प्रती छापल्या जात. त्यापैकी १२५ प्रती वाचनालयांना व संशोधकांना मोफत वाटल्या जात असत. हळूहळू 'गायकवाड ओरिएन्टल

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / ११