पान:महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिरिज' पाश्चात्य संशोधन पध्दती आणि प्रकाशन संहितेनुसार हस्तलिखितांच्या संशोधित आवृत्या प्रकाशित करू लागली. हिंदू, बौद्ध, जैन या प्रमुख भारतीय धर्मांच्या दुर्मिळ आणि मौलिक हस्तलिखितांचे चिकित्सक संपादन आणि प्रकाशनाचे ऐतिहासिक काम या संस्थेच्या माध्यमातून सयाजीरावांनी केले. यामध्ये गुजराथी, संस्कृत, पाली, अर्धमागधी, अरेबिक आणि पोर्तुगीज भाषेतील ग्रंथांचा समावेश आहे. १९१६ ते १९३९ अखेर या ग्रंथमालेत ८४ ग्रंथ प्रकाशित झाले. सयाजीरावांच्या मृत्यूनंतर आजअखेर ही माला सुरू असून १८७ ग्रंथ या मालेत प्रकाशि झाले आहेत. या ग्रंथमालेत प्रकाशित केलेल्या ग्रंथांच्या दर्जामुळे बडोदा प्राच्यविद्या संस्थेने आंतरराष्ट्रीय मान्यता मिळविली होती आणि आजही ती कायम आहे. अत्यंत कमी काळात 'गायकवाड ओरिएन्टल सिरिज'चा आंतरराष्ट्रीय दबदबा एवढा होता की महाराज एकदा लंडनच्या इंडिया ऑफिस ग्रंथालयात गेले असता या सिरिजचे प्रणेते म्हणून त्यांना प्रथम प्रवेश देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

 बडोदा संस्थानचे पहिले भारतीय लष्कर प्रमुख राजरत्न जनरल नानासाहेब शिंदे होते. नानासाहेब शिंदेंच्या 'घोड्यावरील मर्दानी खेळ' या ग्रंथात मराठा साहित्य संमेलनाच्या १९ व्या अधिवेशनात नानासाहेब शिंदेंनी केलेले भाषण प्रसिद्ध आहे. या भाषणात बडोदा प्राच्यविद्या संस्थेचे आणि गायकवाड ओरिएन्टल सिरिजचे महत्त्व अधोरेखित करताना नानासाहेब शिंदे म्हणतात,

महाराजा सयाजीराव आणि प्राच्यविद्या / १२