Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



पुरानिक पेशा पत्करल्यामुळे याज्ञिकी, वैद्यकी व्यवसायाबरोबर महाभारत, रामायण, भागवत, वेद, उपनिषद त्यांना तोंडपाठ होते. दादासाहेबांना सहा भावंडे होती. सर्वात थोरले बंधू शिवरामपंत, दादासाहेबांपेक्षा बारा वर्षांनी मोठे होते. ते बडोद्याला दिवाण श्री. आर. सी. दत्त यांच्या हाताखाली रेव्हेन्यू खात्यात नोकरी करत असत. दादासाहेबांना चार बहिणी होत्या. त्यापैकी एका बहिणीचे लग्न बडोद्याच्या पटवर्धनांशी झाले होते. त्यामुळे बहीणही बडोद्यात होती. दाजीशास्त्री मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. त्यामुळे फाळके कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. दादासाहेबांचे प्राथमिक शिक्षण त्र्यंबकेश्वरला झाले होते, तर मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मुंबईत मराठा हायस्कूल येथे झाले होते.

 दादासाहेबांनीही आपला संस्कृत पंडिताचा व्यवसाय पुढे चालवावा अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. पण दादासाहेबांना चित्रकला हा विषय खूप आवडायचा. त्यांचा सगळा कल कलेकडे होता. त्यांना कलेची जन्मजात दैवी देणगी मिळालेली होती. घरगुती समारंभात ते सुबक सुंदर रांगोळ्या काढायचे. तसेच विविध उत्सवात देखावे, मखरी, सजावट तयार करून देण्याचे काम ते मन लावून करत असत. त्यांच्यातल्या कलाकाराला ही कामे करण्यात कधी कंटाळा येत नसे. पुढे श्रीगणेशाच्या आकर्षक मूर्तीही बनवू लागले. मुलाची आवड आणि शिकण्याचा कल लक्षात घेऊन वडिलांनी त्यांना त्यांच्या

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / ९