पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजच्या काळाचीसुध्दा हीच गरज आहे. यावरून महाराजांची दूरदृष्टी दिसून येते. इतर संस्थानिक जेव्हा ऐशोआरामात जीवन जगत होते, तेव्हा महाराजांना बडोद्या राज्याच्या प्रगतीशिवाय दुसरे काहीच विचार सुचत नव्हते.
 कला आणि तंत्रज्ञान यांचे एकाच ठिकाणी शिक्षण घेऊन विद्यार्थी व्यावसायिक प्रगती करू शकेल हाच कलाभवनाचा उद्देश होता. या कलाभवनात संगीत, चित्रकला, कुंभारकाम, रंगकाम, ब्लिचिंग, कॅलिको प्रिंटिंग, मूर्तिकाम - शिल्पकाम, वास्तुकला, स्थापत्यकला, ग्राफिक्स (Graphics), अप्लाइड आर्ट्स (Appliedarts), आर्ट हिस्ट्री ( ArtHistory), सौंदर्यशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र, छायाचित्रकला (Photography) वगैरे विषय शिकविले जात असत. आपल्या राज्यात असे निरनिराळे विषय शिकून त्यातले तज्ज्ञ लोक तयार व्हावेत आणि त्यांनी या सर्व कला आणि तंत्रज्ञानाचा प्रसार करावा. त्याचा व्यवसायात उपयोग करून राष्ट्रातली उद्योजकता वाढवावी हेच एकमेव ध्येय ठेवून महाराजांनी कलाभवनाची स्थापना केली होती.

 महाराजांनी अनेक वर्षांपासून फोटोग्राफी या कलेला प्रोत्साहन दिलेले होते. 'विविध कला मंदिर' या नावाची फोटोग्राफीची संस्था बडोद्यात होती. ती त्यावेळेस सुप्रसिध्द होती व त्याचे सर्व श्रेय त्यातील कुशल कारागीर श्री. शितूत यांना जात होते. शितूत हे कलाभवनातून शिकून तयार झालेले विद्यार्थी होते. इ. स. १९०० च्या सुमारास महाराजांनी कलाभवनास भेट दिली.

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / ७