Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराजा सयाजीराव
आणि
दादासाहेब फाळके

 महाराजा सयाजीराव गायकवाडांना शिक्षण हेच प्रगती आणि परिवर्तनाचे एकमेव साधन आहे हे कळाले होते. प्रजा जर अशिक्षित राहिली तर ती रोजच्या कामात, राजकारणात, कारभारात, प्रशासनात सहयोग देऊ शकणार नाही. महाराज जगभरात जिथे जिथे फिरले आणि तिथे जे जे म्हणून नवीन पाहिले, ते आपल्या राज्यात कसे आणता येईल याशिवाय त्यांच्या डोक्यात दुसरा कोणताच विचार नसे. ते नेहमी म्हणत “I have no domestic life" प्रजेचा पालनकर्ता या भूमिकेत ते कायम असत. प्रथम प्रजा, मग राजा असे धोरण त्यांनी अवलंबविले होते. प्रजेला नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि त्याचबरोबर प्रशिक्षण या दोन गोष्टींना त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. याचसाठी १८९० मध्ये महाराजांनी कलाभवनाची स्थापना केली. या संस्थेचे नाव सुध्दा खूप मार्मिक ठेवले गेले. तंत्रशिक्षणाने युरोपात केलेली प्रगती स्वतः डोळ्याने बघून आणि अनुभव घेऊन आले होते. नवे तंत्रज्ञान शिकल्याशिवाय आणि त्याचा वापर केल्याशिवाय भारत प्रगती करू शकणार नाही, हे त्यांनी १४० वर्षांपूर्वीच ओळखले होते.

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / ६