पान:महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सेनापती कचेरीच्या इमारतीत होते. सयाजीराव महाराज स्वतः कधीही अचानक कलाभवनास भेट देत असत. त्यामुळे तेथील शिक्षकांना तांत्रिक कामात दक्ष राहावे लागत असे. दादासाहेब जेव्हा कलाभवनात आले, तेव्हा त्यांनी मूर्तिकला शिकण्यास प्रारंभ केला. ते शिवलाल उगारचंद सलाट यांच्या हाताखाली मातीकाम शिकले. त्याचप्रमाणे मशीन ड्रॉइंग, फोटोग्राफी इत्यादीचे वर्गही त्यांनी पूर्ण केले. त्यावेळेस अगदी अद्ययावत डार्करूम कलाभवनात उपलब्ध होती. तसेच अत्यंत आधुनिक किमती जर्मन व विलायतेतले कॅमेरे उपलब्ध होते. अशाप्रकारे कलाभवन आधुनिक सामग्रीने सज्ज होते. त्यामुळे दादासाहेबांनी या तंत्रज्ञानाचा पुरेपूर लाभ घेतला. प्राचार्य गज्जरांनी दादासाहेबांना सर्व उपकरणे हाताळायची परवानगी दिली होती.
कलाभवनात चित्रपट निर्मितीचा पाया रोवला

 दादासाहेबांचा चित्रपटासाठी आवश्यक तंत्रांचा अभ्यास बडोदा कलाभवनात झाला. कलाभवनात शिकत असताना चित्रपट निर्मितीबाबत कोणताही विचार त्यांच्या मनात नव्हता. आर्किटेक्चर आणि मॉडेलिंग या विषयातही ते तरबेज झाले होते. याच दरम्यान त्यांनी एक छायाचित्रणाचा कॅमेरा घेतला होता. छायाचित्र कसे घ्यायचे, त्यावरील प्रक्रिया, प्रिंटिंग वगैरे स्वत:च प्रयोग करून शिकत होते. इ.स. १८९२ ला त्यांनी एका नाट्यगृहाची सुबक आणि आदर्श प्रतिकृती तयार केली

महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / १२