या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
होती. अहमदाबादच्या औद्योगिक प्रदर्शनात या आराखड्यास सुवर्णपदक बहाल करण्यात आले. दादासाहेबांना इतर कलांतही सुवर्ण व रौप्यपदके वेळोवेळी मिळत होती. त्यामुळे कलाभवनाचा एक हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून ते ओळखले जाऊ लागले. प्राचार्य गज्जरांनी महाराजांच्या परवानगीने इ.स. १८९३ मध्ये दादासाहेबांना कलाभवनाचा फोटो स्टुडियो व रसायनशाळा वापरण्याची पूर्ण मुभा दिली. मग दादासाहेब या छायाचित्रणाच्या कामात दिवसेंदिवस रमू लागले. पुष्कळ वेळा ते रसायनशाळेत रात्री उशिरापर्यंत काम करत असत. याचबरोबर फाळकेज् फोटो एनग्रेव्हिंग व फोटो प्रिंटिंग ही त्यांची संस्थाही नावारूपास आली. या आपल्या संस्थेचे काम ते विदेशी छायाचित्रकाराइतकेच दर्जेदार करू लागले. तसेच ते बडोद्यात उस्ताद मौलाबक्ष यांच्या गायनशाळेत शास्त्रीय गायन शिकले.
महाराजा सयाजीराव आणि दादासाहेब फाळके / १३