पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ते लेखक, संशोधक, तत्वज्ञ, कलाकार इ. लोकांशी त्यांनी केलेली जाणीवपूर्वक चर्चा, जगातील प्रमुख विद्यापीठे आणि ग्रंथालयांना दिलेल्या भेटी, तेथे केलेल्या चर्चा आणि भाषणे इ. वरून सयाजीरावांच्या 'ज्ञानमार्गी' पर्यटनाचे प्रतिबिंब सातत्याने दिसते.
 महाराजांच्या समकालीन भारतीय राजांच्या त्याचप्रमाणे शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या लोकांच्या परदेशातील कर्तबगारीचे किस्से गेल्या ६० वर्षात भारतात सातत्याने चर्चिले गेले. परंतु आश्चर्यकारकरित्या सयाजीरावांच्या विश्वपर्यटनाचा कोणताही संदर्भ भारतातील या चर्चेत कानी पडत नाही. याचा स्पष्ट अर्थ इतकाच की आपली 'गॉसिप्स' संस्कृती अशा पर्यटनाला दोन पावलापुरती जागा उपलब्ध करून देत नाही. थोर शास्त्रज्ञ आणि भारताचे माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 'व्हिजन २०२०' चे स्वप्न पहिले होते. त्यांचे असे मत होते की भारत हा महासत्ता होईल. परंतु महासत्ता होण्यासाठी 'ज्ञानसत्ता' आवश्यक असते आणि ज्ञानसत्तेसाठी 'ज्ञानमार्गी' होऊन 'ज्ञानसाधना' करणे आणि समाजात ज्ञाननिष्ठा निर्माण करणे ही पूर्वअट असते. आपण या पूर्वअटींचे पालन करू शकलो नाही. परिणामी आपल्या महासत्ता होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जगाच्या 'हंगर इंडेक्स' मध्ये आपण पाकिस्तान, बांग्लादेश आणि इतर आफ्रिकन अप्रगत देशांच्याही खाली आहोत.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७६