पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

होता. त्यामुळेच श्री. राजगोपालाचारी यांनी 'भारतातील शिवरायांनंतरचा सर्वश्रेष्ठ राजा' ही उपाधी सायाजीरावांना का दिली होती याचा जसा उलगडा होतो त्याचप्रमाणे ही उपाधी किती समर्पक होती हेसुद्धा अगदी सहजपणे स्पष्ट होते.
 आजच्या भारतातील पर्यटन संस्कृतीचा पायाभूत उद्देश विचारात घेता 'मौजमजा ' हेच तिचे सर्वसाधारण उद्दिष्ट असल्याचे दिसते. अपवादात्मक उदाहरण म्हणून अलीकडे तणावमुक्ती हे पर्यटनाचे प्रमुख उद्दिष्ट होताना दिसते. 'ज्ञानप्राप्ती' हा पर्यटनाचा उद्देश अजून भारतीय पर्यटन संस्कृतीच्या परिघावरसुद्धा आढळत नाही. या पार्श्वभूमीवर १०० वर्षांपूर्वी सयाजीराव सातत्याने 'ज्ञानपर्यटन' करत होते ही बाब अद्भुतच म्हणावी लागेल. महाराजांच्या जगप्रवासाच्या या अहवालांचा अजून एक महत्वाचा निष्कर्ष म्हणजे महाराज हे भारतीय पर्यटन संस्कृतीचे मुख्य उद्गाते होते असा सिद्धांत मांडण्याइतके भक्कम पुरावे सयाजीरावांच्या 'प्रवासदृष्टीत' सापडतात. प्रवासात जाताजाताही आपल्या नकळत 'ज्ञानप्राप्ती' होत असते. परंतु महाराजांच्या या २६ जगप्रवासांचा चिकित्सक वेध घेत असताना प्रकर्षाने जाणवणारी बाब म्हणजे महाराज सातत्याने सर्व क्षेत्रातील 'सर्वोत्तम ज्ञानाचा' सातत्याने शोध घेत होते हे लक्षात येते. याचे पुरावे जेव्हा आपण शोधू लागतो त्यावेळी महाराजांनी परदेशातील विविध संस्था, उद्योग यांना दिलेल्या अभ्यासभेटी, जगातील सर्व प्रमुख राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांपासून

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७५