पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 महाराज आपल्या चोवीसाव्या युरोप दौऱ्यासाठी ११ एप्रिल १९३६ ला मुंबईहून रवाना झाले. ३ जुलै १९३६ ला लंडनमधील जागतिक सर्वधर्म परिषदेच्या उद्घाटन सत्रात सयाजीरावांनी उद्घाटनपर भाषण केले. ज्याची दखल जगातील सर्व वृत्तपत्रांनी घेतली. महाराजांनी मानवतेसाठी केलेले काम आणि त्यांना ६० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल 'विश्वाचे विश्व संगोपन' या संस्थेच्या सदस्यांकडून त्यांच्या सह्या असणारे निवेदन सयाजीरावांना देण्यात आले. ३१ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान सयाजीराव बर्लिन येथील वास्तव्यास होते. येथे होणारे ऑलिंपिक सामने पाहणे हे बर्लिन वास्तव्याचे वैशिष्ट्य होते. याच वर्षी बडोदा संस्थानने केलेल्या ऑलिंपिक प्रवेशामुळे महाराज खूप आनंदी होते. ऑलिंपिकच्या प्रभावामुळे सयाजीरावांनी बडोदा संस्थानात शारीरिक शिक्षण अनिवार्य केले. पॅरिसमध्ये असताना महाराजांनी सेकंड बटलर म्हणून आर्मीन हर्लीमॅन यांची नियुक्ती करून त्यांना लवकरात लवकर बडोद्याला जाण्याचा आदेश दिला. सयाजीराव ७ महिने १४ दिवसांच्या या परदेश दौऱ्यानंतर २४ नोव्हेंबर १९३६ ला भारतात परतले.
पंचवीसावा प्रवास : १९३६
 पहिल्या महायुद्धानंतर इम्पेरियल एअरवेज सेवेने भारत ते इजिप्त विमान सेवेचे उद्घाटन केले, त्याचवेळी महाराजांनी या हवाई मार्गाने प्रवास करण्याचे ठरवले होते. सयाजीरावांची

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७०