पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लंडन येथेच व्हावी आणि या काळात कमी होत चाललेल्या पारसी धर्मावर कोणीतरी बोलावे असे पत्राद्वारे सुचविले. पुढे २५ जुलै १९३५ ला सयाजीरावांनी १९३६ मध्ये होणाऱ्या या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय सर्वधर्म परिषदेसाठी मदत म्हणून यंगहरुबंड यांच्याकडे १०० पौंडांचा धनादेश दिला.
 २७ ऑगस्ट १९३५ च्या विश्वशांती दिवसासाठी निघणाऱ्या 'एप्रिसिएशन' या मासिकामध्ये सयाजीरावांच्या राज्यकारभाराचा आढावा दासगुप्त यांनी घेतला होता. महाराजांनी पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला येणाऱ्या अप्पासाहेब घोरपडे यांच्या चिरंजीवांना महिन्याला २० पौंड शिष्यवृत्ती देवु केली. १२ ऑगस्टला सयाजीरावांनी भारताचे ब्रिटिश राजचे सचिव लॉर्ड झेटलँड यांना पत्र लिहून सर्व भारतीय खेळांचे विश्वसंग्रहात्मक पुस्तक लिहिण्याची सूचना केली. नितीतत्त्वांना वैज्ञानिक विचारांशी जोडून आधुनिक जीवनात त्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने इस्ट्बोर्न येथील डॉ. स्टॅन्टन कॉयट यांनी चालवलेल्या चळवळीसाठी सयाजीरावांनी मदत म्हणून १०० पौंडांचा धनादेश दिला. महाराजांनी भारतात केलेल्या ग्रंथालय चळवळीसंदर्भातील कामाबद्दल लायब्ररी असोसिएशनच्या कौन्सिलने त्यांना मानद उपाध्यक्षपद स्वीकारण्याच्या केलेल्या विनंतीनुसार सयाजीरावांनी २५ ऑक्टोबर १९३५ ला हे पद स्वीकारले.
चोवीसावा प्रवास : १९३६

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६९