पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही जुनी इच्छा पंचविसाव्या परदेश दौऱ्यावेळी पूर्णत्वास आली. ते १९३६ मध्ये भारतातून इजिप्तला विमानातून गेले. सयाजीराव १५ डिसेंबर १९३६ ते ३० नोव्हेंबर १९३७ दरम्यान ११ महिने १७ दिवस परदेश दौऱ्यावर होते. यावेळी महाराजांचा मुक्काम पहिल्यांदा इजिप्तला होता. महाराजांनी लक्सौरमधील मोजक्या पण मुख्य स्थळांना भेटी दिल्या. परंतु या स्थळांना भेट देण्यापूर्वी किंवा दिल्यानंतर सयाजीराव त्या स्थळासंदर्भातील माहिती असणारी विविध पुस्तके वाचत असत. सयाजीरावांनी आसुअनमधील सरकारी तांत्रिक शाळेला भेट दिली. बडोद्यातील कलाभवनसारख्या असणाऱ्या या शाळेतील मोटारींचे डिझाईन बनविण्यास व त्यांचे उत्पादन करण्यास शिकविल्या जाणाऱ्या मोटार यांत्रिकी विभागाचे अनुकरण भारतात करण्याचा विचार सयाजीरावांनी केला.
 सयाजीराव इंग्लंडमध्ये देअर मॅजेस्टीस यांचा राज्याभिषेक सोहळा आणि इम्पेरियल कॉन्फरन्समध्ये भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. इम्पेरियल कॉन्फरन्सच्या उद्घाटन प्रसंगी झालेल्या प्रमुख प्रतिनिधींच्या भाषणात सयाजीरावांचेही भाषण होते. सयाजीरावांना ऑक्सफर्ड येथील युनिव्हर्सिटी रालेह क्लबच्या वार्षिक रात्री- भोजनप्रसंगी आमंत्रित केले होते. या क्लबमध्ये भाषण देणारे सयाजीराव हे पहिले भारतीय होते. इंग्लंडमधील वास्तव्यात सयाजीरावांनी या क्लबचे आणि

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ७१