पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदेशानुसार गरजू लोकांना खिचडी पुरवण्यात आली. कोपेनहॅगन येथील सरकारी दुग्ध उत्पादन केंद्राला महाराजांनी भेट दिली. तेथे त्यांनी मलई, लोणी आणि चिज बनवण्याची प्रक्रिया समजून घेतली. महाराजांनी शर्यतीच्या घोड्यांची पागा सुरू करण्याचा निर्णय घेतला व शर्यतीच्या घोड्याच्या पागेचे व्यवस्थापक म्हणून श्री. एस. एस. गायकवाड यांची नेमणूक केली.
अठरावा प्रवास : १९२८

 महाराजांचा अठरावा परदेश प्रवास फ्रान्स, स्वित्झर्लंड, स्वीडन, डेन्मार्क, जर्मनी येथे ११ एप्रिल १९२८ ते २८ डिसेंबर १९२८ असा ८ महिने १७ दिवसांचा होता. पॅरिसमध्ये असताना महाराजांना पॉलिटेक्निक येथे सेरेमनी द ला पोझ ज्या ठिकाणी फ्रेंच राष्ट्राध्यक्षही उपस्थित होते त्या समारंभाचे आमंत्रण होते. महाराज २७ जूनला इंग्लंडमधील दि एंपायर गार्डन पार्टीला उपस्थित राहिले. या ठिकाणी सम्राट व सम्राज्ञीही उपस्थित होते. ती संपूर्ण दुपार महाराजांनी सम्राटांसोबत व्यतीत केली. २८ डिसेंबरला या दौऱ्यावरून भारतात आल्यावर महाराजांनी २९ तारखेला नवसारी पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन केले.

एकोणिसावा प्रवास : १९२९

 महाराज १६ मार्च १९२९ ला मुंबईहून युरोपसाठी निघाले. १४ एप्रिलला सयाजीरावांनी मेमर्स येवेल बॅचच्या श्री. बॅच आणि

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ६०