पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिले. १९ नोव्हेंबर १९२६ ला महाराज मुंबई बंदरावर पोहोचले. महाराजांचा हा प्रवास ८ महीने ८ दिवसांचा होता. या परदेश वास्तव्यात महाराजांना आलेल्या व त्यांनी पाठवलेल्या पत्रांची एकूण संख्या २००३ इतकी आहे. यावरून महाराजांनी परदेशात असताना केलेल्या कामाची कल्पना येते.
सतरावा प्रवास : १९२७

 ९ एप्रिल १९२७ ते १३ जानेवारी १९२८ अशी ९ महीने ४ दिवसांची महाराजांची ही युरोप वारी होती. १७ जूनला महाराजांच्या इच्छेनुसार रा. ब. अंबेगावकर आणि पानेमेंगलोर हे प्रो. विजेरी यांना भेटण्यासाठी केंब्रिज विद्यापीठात गेले. यावेळी महाराजांच्या भाषणांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या संदर्भात त्यांनी चर्चा केली. सयाजीराव जिनिव्हात असताना त्यांना एका स्विस वर्तमानपत्रातून बडोद्यात आलेल्या पुराची बातमी समजली. या बातमीने व्यथित झालेल्या महाराजांनी तातडीने बडोद्याच्या दिवाणांना तार करून “संकटात सापडलेल्यांना सर्वतोपरी मदत करावी.” असा आदेश दिला. महाराजांनी ९ ऑगस्टला पूरग्रस्तांच्या निधीसाठी १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. राजपुत्र धैर्यशिलराव यांनी स्वतः लक्ष घालून पूरग्रस्तांना सहकार्य करण्याची सूचना महाराजांनी तार करून दिली. त्याचबरोबर नवीन घरे बांधताना संडासची, त्यासाठी पाण्याची योग्य व्यवस्था असणारी आधुनिक घरे बांधावीत अशाही सूचना महाराजांनी केल्या. यावेळी सयाजीरावांच्या

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५९