पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सयाजीरावांनी भेट दिली. येथील फाइन आर्टचे वार्षिक प्रदर्शन महाराज तेथे पोहोचण्यापूर्वीच संपले होते. परंतु या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आलेले श्री. सोलेमन यांनी बनविलेले सयाजीरावांचे पूर्णाकृती पोट्रेट महाराजांना बघता यावे म्हणून न हलवता त्या ठिकाणीच ठेवण्यात आले होते.

 २७ ऑगस्टला महाराजांनी पीकॅडली हॉटेल येथे युरोपहून ओखा बंदरास नियमित जहाज सेवा सुरू करण्यासंदर्भात लंडनमधील विविध अधिकाऱ्यांसोबत एक परिषद आयोजित केली. यानंतर काही दिवसांनी याच विषयासंदर्भात दुसरी बैठक पार पडली. याचे फलित म्हणून एका मोठ्या जहाज कंपनीचे प्रमुख सर जॉन केलरमन यांनी कोणत्याही अटीशिवाय ओखा बंदरास दरमहा स्टीमर सर्व्हिस देण्याचे मान्य केले. २१ सप्टेंबरला आणखी एक बैठक झाली. या बैठकीत प्रामुख्याने ओखा बंदर अधिक कार्यक्षमतेने कार्यरत राहण्यासाठी अधिकच्या सोयी सुविधा, जसे की, बंदरास जोडणारे रस्ते, गावाचे नियंत्रण, बडोद्यास मीटर गेज रेल्वेने जोडणे यावर चर्चा झाली.

 महाराज युरोपहून भारतात परतताना जहाजामध्ये त्यांची भेट भारत सरकारच्या निमंत्रणावरून भारतात यौनरोग प्रतिबंध व उपाययोजनेच्या संदर्भात व्याख्याने व प्रदर्शने आयोजनासाठी येत असलेल्या श्रीमती नेविल रोल्फ आणि डॉ. लेस यांच्याशी झाली. महाराजांनी त्यांना परतण्यापूर्वी बडोद्यास येण्याचे निमंत्रण दिले. त्यावर त्यांनी मार्च १९२७ मध्ये येण्याचे आश्वासन

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५८