पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अकरावा प्रवास : १९१४

 महाराजांनी १८ मे १९१४ ते ४ डिसेंबर १९१४ असा ६ महिने १४ दिवसांचा हा स्वित्झर्लंडचा (सेंट मॉरीट्झ ) प्रवास प्रकृती स्वास्थ्यासाठी डॉक्टरांच्या सांगण्यावरून केला होता. या प्रवासात महाराजांनी ब्रिटिश प्रतिनिधी गॅलंड व कॅप्टन शिवराज सिंह यांच्यासह लौसन्ने येथील उत्तम दवाखाने आणि शाळांना भेटी दिल्या. अद्ययावत सुविधा असलेल्या या संस्थांना भेटी देताना आपल्या संस्थानात अशा सुविधा कशाप्रकारे सुरू करता येतील आणि आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये कसे पाठवता येईल याचा विचार करत असत. महाराजांनी येथील शाळेमध्ये कु. पांढरे आणि कु. पुणेकर यांचा प्रवेश निश्चित केला परंतु युरोपातील युद्धजन्य परिस्थितीमुळे ते प्रत्यक्षात येऊ शकले नाहीत.

 बेऊमाँटचे सरदार महाराजांना फ्रान्स रेडिओ इलेक्ट्रिक संस्थेस भेटीसाठी घेऊन गेले. तेथे बिनतारी संदेशवहन यंत्रे बनवली जात होती. महाराजांनी त्याची कार्यप्रणाली, स्थापना आणि ही यंत्रणा समुद्र व जमिनीवर कशा पद्धतीने कार्य करते हे समजून घेतले. ज्यावेळी जर्मनी व इंग्लंडमधील युद्धाची घोषणा झाली त्यावेळी बडोद्यातून महाराजांना बडोदा संस्थानचे सर्व प्रकारचे सहाय्य ब्रिटनच्या सम्राटांना दिले जाईल, असे इंडिया ऑफिसला कळवण्याचे सुचवण्यात आले. त्याप्रमाणे महाराजांनी लॉर्ड क्रेवे यांना तार करून याबद्दल कळविले. महाराजांची विची येथे

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / ५०