पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चांगली सुधारणा झाली. वजन १० पौंडनी वाढले. महाराजांना उत्तम झोप मिळू लागली. या परदेश प्रवासानंतर महाराजांना प्रायश्चित्त घ्यावे लागले. त्यासाठीचा खर्च २७ हजार रु. आला. पुढे आदेश काढून महाराजांनी ही पद्धत बंद केली.

 या परदेश दौऱ्याचे मुख्याधिकारी धामणस्कर यांनी बजावलेल्या उत्तम कामगिरीवर खुश होऊन महाराजांनी त्यांना १५० रु. मासिक पगारवाढ दिली. तर या प्रवासाचे हिशेबनीस सदाशिव महादेव यांना १०० रु. बक्षीस दिले. अविश्वसनीय वाटेल असा एक निर्णय महाराजांनी याच दौऱ्यात घेतला. तो म्हणजे त्यांच्या मातोश्री महाराणी जमनाबाई यांना द्यावयाच्या रकमेसंदर्भातील होता. जमनाबाईंना त्यांचे कर्ज फेडण्यासाठी मोठी रक्कम त्वरित हवी होती. महाराजांनी जमनाबाईंची सर्व खाते तपासून ५० हजार रु. निधी मंजूर केला. जमनाबाईंना महाराजांनी त्यांचे खाते तपासणे आवडले नाही. ज्या जमनाबाईंनी दत्तक म्हणून सयाजीरावांची निवड केली होती त्यांच्या आर्थिक शिस्तीबाबतचे महाराजांचे धोरण त्यांच्यातील कठोर प्रशासकाचे दर्शन घडविते.

दुसरा प्रवास : १८८८

 पहिल्या जगप्रवासानंतर ६ महिने भारतात राहून महाराज पुन्हा दुसऱ्या जगप्रवासासाठी २६ जून १८८८ ला स्वित्झर्लंडला गेले. हा दौरा ३ महिने १२ दिवसांचा होता. यावेळीसुद्धा पहिल्या दौऱ्याप्रमाणे सर इलियट महाराजांसोबत होते. परंतु यावेळी

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / २५