पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ही इच्छा महाराजांनी पुढील शब्दात व्यक्त केली होती. 'महाराजांची अशी इच्छा आहे की, एका वर्षात मी २५ वेळा युरोपच्या केलेल्या प्रवासाबाबत लिखाण करायचे असून त्यांना तुमची मदत असावी असे त्यांना वाटते. या लिखाणातून केवळ त्यांचे व्यक्तिमत्त्व व्यक्त व्हावे असे नसून कार्यालयीन व अर्ध कार्यालयीन इतिहासही त्यातून स्पष्ट व्हावा असे त्यांना वाटते. हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून त्यात तुम्हालाही आवड आहे असे मी त्यांना कळवले आहे.'

 महाराजांना आपल्या परदेश दौऱ्यावरील पुस्तकात त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर या परदेश दौऱ्यात त्यांनी केलेल्या प्रशासकीय आणि संलग्न कामाचा इतिहासही नोंदविला जावा असे वाटत होते. १९३६ ला महाराजांनी ही इच्छा व्यक्त केल्यानंतर आज ८३ वर्षांनी आपण जेव्हा महाराजांची ही भूमिका आणि त्याप्रमाणे तयार झालेला ग्रंथ यांचा विचार करतो तेव्हा महाराजांच्या दुरदृष्टीचे कौतुक वाटते. कारण राज्यकर्त्यांच्या परदेश दौऱ्यांच्या इतक्या काटेकोर नोंदी ठेवल्याचे दुसरे उदाहरण भारतात सापडत नाही. महत्वाचे म्हणजे महाराजांचे हे जगप्रवासाचे अहवाल महाराजांचे चरित्र आणि बडोद्याच्या प्रगतीचा इतिहास समजून घेण्याचे आज महत्वाचे समकालीन साधन म्हणून महत्वाचे ठरतात.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १७