पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मदत करण्याचे हुकूम आणि व्यवस्था अधिकाऱ्यांवर सोपवून जड अंतःकरणाने, प्रकृती कारणाने बडोदा सोडावे लागत आहे. पाऊस पडेपर्यंत जनतेला मदत करणे आमचे काम आहे, ती कामे मार्गी लावून मी जात असलो तरी माझे लक्ष बडोद्याकडेच लागून राहिले आहे."

 महाराजांच्या डायरीतील वरील नमुना वाचला असता महाराजांच्या परदेश वाऱ्यांबाबत ब्रिटीशांचा संशय व्यक्त होतो. त्याचप्रमाणे परदेश प्रवासामुळे राज्यात गैरहजर राहणे हे महाराजांसाठी वेदनादायी होते हेही जाणवते. दुष्काळ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नाइलाजाने प्रकृती स्वास्थ्यासाठी महाराजांना परदेशी जावे लागले. परंतु दौऱ्यावर जाण्याअगोदर दुष्काळ व्यवस्थापनाची तयारी करून, अधिकाऱ्यांना सूचना देऊन जरी महाराज परदेशात गेले तरी त्यांचे पूर्ण लक्ष मात्र बडोद्यातील दुष्काळावर होते हे वाचताना त्यांच्यातील संवेदनशील राजाचे दर्शन घडते.

 २१ डिसेंबर १९३६ ला महाराजांनी त्यांचे सचिव मि. हॅम यांनी नायब हुजुर कामदार व्ही. पी. नेने यांना महाराजांची त्यांच्या २५ परदेश दौऱ्यांवरील ग्रंथलेखनाची इच्छा असल्याचे कळवले. त्यानुसार १८८७ ते १९०६ या कालावधीतील परदेश प्रवासावरील 'सुरुवातीच्या जगप्रवासाच्या नोंदी भाग - १' हा ग्रंथ १९३८ मध्ये प्रकाशित झाला.

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १६