पान:महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. हा बदल मला महत्त्वाचा वाटतो. विलायतेत जाणे अशुभ अथवा अनिष्ट नाही, हा बदलही चांगला आहे. यामुळे दुसऱ्या जगाच्या संस्कृतीची ओळख होईल. १८८७ ला आम्ही पहिली विलायतवारी केली, त्यामुळे आमच्या मातृश्री, काक्या आणि वडीलधाऱ्या मंडळींनी चिंता आणि भीतीने घेरलेल्या अवस्थेत मला निरोप दिला. त्यावेळी अनोळखी देशासंबंधीचे अज्ञान, अंधश्रद्धातील भीतीच चेहऱ्यावर दिसत होती. काळ्या पाण्यावरून जाणारे परत येण्याची शक्यता कमी, तेथे काय खाणार? तिथली माणसे कशी आहेत ? एक ना अनेक शंकांनी ही मंडळी मुकी झाली होती.

 रेल्वेस्टेशनवर निरोप देण्यासाठी आलेले अधिकारी, मानकरी, कारभारी आणि जनसमूहाच्या चेहऱ्यावरचे दुःख आणि काळजी बघून मला 'दुरावा हेच गोड दुःख' या शेक्सपिअरच्या वचनाची आठवण झाली. काहींच्या डोळ्यातील अश्रू आणि चेहऱ्यावरचे दुःख राजासंबंधीच्या काळजीयुक्त प्रेमाचे दर्शन झाले. रेल्वेने बडोदा स्टेशन सोडले आणि मी सर्वांचा जडअंतःकरणाने निरोप घेतला.

 प्रकृती स्वास्थ्यासाठी पुढे वारंवार दीर्घकाळ मला युरोपला जावे लागले. मात्र यावर्षी बडोद्याला दुष्काळाने घेरले असताना उपचारासाठी युरोपला जायला मन धजत नव्हते. दुष्काळाने भाजून निघालेल्या प्रजेसाठी आम्ही मदत सुरू केली. दुष्काळी कामांना वेग आला. मदत केंद्र सुरू केले. अवर्षणग्रस्त प्रजेची

महाराजा सयाजीराव आणि ज्ञानमार्गी जगप्रवास / १५