पान:महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. त्यांनी आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक, शिक्षण, शेती, न्याय अशा लोकोपयोगी क्षेत्रात बडोद्याचा चेहरामोहरा बदलून टाकला. सत्तेचा उपयोग त्यांनी जनकल्याणासाठी केला. काही काळातच बडोदा राज्य देशात पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. हा बदल निश्चितच एका दिवसात झाला नाही. त्यासाठी त्यांना आठ-दहा वर्षे अविश्रांत श्रम करावे लागले. त्यांना मिळालेल्या शिक्षणामुळे हे सर्व शक्य झाले. संपूर्ण सत्ताकाळात प्रशासनावर वचक ठेवताना त्यांनी लोककल्याणाचा ध्यास सोडला नाही. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गोरगरीब, आदिवासी आणि अस्पृश्य प्रजेच्या जीवनात परिवर्तन झाले. याचबरोबर पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठीही परिश्रम घेतले.

 सयाजीराव महाराजांच्या सर्वच सुधारणा जनकल्याणाच्या होत्या. त्यातील महत्त्वाची योजना म्हणजे प्रजेला स्वच्छ आणि मुबलक पाणीपुरवठा करणे ही होय. राज्यकारभार हाती येताच त्यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यात पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे होणारे प्रजेचे हाल पाहिले. तहानलेल्या प्रजेला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महाराजांनी गावोगावी विहिरी खोदण्याचे आदेश दिले. त्यांनी एका भाषणात जाहीर केले. 'जेथे नदीचे पाणी उपलब्ध नाही किंवा विहिरी उथळ आहेत तिथे लोकांना व गुराढोरांना सांजसकाळ पाणी पुरविण्याकरिता दर शंभर माणसांमागे ते ८ रुपये खर्च केला जाईल.' शंभर-दीडशे

महाराजा सयाजीराव आणि जलनियोजन / ७