पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गंगारामभाऊ हे जग सोडून निघून गेले होते. मराठा समाजात आज जी शैक्षणिक जागृती दिसत आहे, त्याचे मोठे श्रेय गंगारामभाऊ म्हस्के व त्यांचे आश्रयदाते महाराजा सयाजीराव गायकवाड यांना आहे. महाराष्ट्रात आज संख्येने मोठा असलेल्या मराठा समाजाच्या या नेत्याबद्दल, संस्थेबद्दल आज आमची अनास्था ही कृतघ्नतेचे आणि अनास्थेचे उदाहरण अस्वस्थ करणारे आहे.
 तावडेंचे वरील निरीक्षण फार महत्त्वाचे आहे कारण मराठा जातीतील अनेक कर्तबगार युगपुरुषांबाबत हे निरीक्षण लागू होते. मराठ्यांनी गंगारामभाऊंप्रमाणेच सयाजीराव गायकवाड, खासेराव जाधव, डॉ. पंजाबराव देशमुख यांच्याबाबतही असेच दुर्लक्ष केले आहे. मराठ्यांच्या उन्नतीसाठी सयाजीरावांनी डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, बडोद्याचा मराठा फंड, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद या संस्थांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये मराठ्यांच्या शिक्षणासाठी खर्च केले.

 खासेराव जाधवांनी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे काम अतिशय तळमळीने उभे केले. डॉ. पंजाबराव देशमुख घटना समितीचे सदस्य होते. त्यांनी ओ.बी.सी. जातींच्या आरक्षणासाठी आग्रह धरला. विशेष म्हणजे मराठा कुणबी जातीचा समावेश ओ.बी.सी. मध्ये केला. महाराष्ट्रभर सभा घेऊन मराठ्यांना तुम्ही कुणबी आहात त्यामुळे तुम्ही तुमच्या जातीच्या नोंदी कुणबी म्हणून करा असे त्यांनी महाराष्ट्राला १९५० च्या

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २५