पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दशकात सांगितले. ज्या मराठ्यांनी आपल्या नोंदी कुणबी अशा केल्या त्यांना ओ.बी.सी. आरक्षणाचा फायदा झाला. मराठ्यांचे इतिहासाबद्दलचे हे अज्ञान गंगारामभाऊंचे काम अलक्षित राहण्यास कारणीभूत ठरले.
 महापुरुष स्वतंत्रपणे अभ्यासण्याच्या आपल्या परंपरेमुळे आपले किती नुकसान होते याचे आत्मपरीक्षण करण्यासाठी तावडेंचे वरील चिंतन फारच उपकारक ठरेल. कारण डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या कार्याचा इतिहास महाराष्ट्राबाहेर बडोद्यात गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही. १८८५ ला सयाजीरावांनी म्हस्केंना आर्थिक मदत सुरू केली. त्यानंतर लगेच जानेवारी १८८६ ला खासेरावांना लिहिलेल्या पत्रात महाराज म्हणाले होते की, या मदतीने आमचे हेतू पूर्ण होण्यास फायदा होईल. आज १४४ वर्षांनंतर आपण जेव्हा महाराजांच्या या पत्राचे वाचन करतो तेव्हा महाराजांचा तो निर्णय किती क्रांतिकारक होता याचा साक्षात्कार होतो.

 गंगारामभाऊंच्या नेतृत्वाने महाराष्ट्रातील मराठ्यांच्या शैक्षणिक क्रांतीचा 'पाया' घातला. या पायातील 'दगड माती' बडोद्यातून आली होती. हा इतिहास महाराष्ट्रातील बहुजनांमध्ये ‘चैतन्याचे झरे' फुलवेल असा आहे. डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन, बडोद्यातील मराठा फंड आणि अखिल भारतीय शिक्षण परिषद या तीन संस्थांच्या माध्यमातून सयाजीरावांनी मराठ्यांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च केले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम १०० ते १५० कोटींच्या घरात जाईल.

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २६