पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किती आव्हानात्मक असेल याची कल्पनाच केलेली बरी. तावडेंनी केलेले या ऐतिहासिक अज्ञानाचे 'पोस्टमार्टम' अत्यंत मार्मिक आहे. तावडेंचे विश्लेषण आपल्याला आत्मटीकेकडे घेऊन जाईल.

 शिक्षणतज्ज्ञ सीताराम तावडे यांनी १९३५ मध्ये डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त प्रकाशित ग्रंथात व्यक्त केलेली खंत आणि मराठा समाजाची आपल्या इतिहासाबद्दलची अनास्था आपल्याला आत्मटीकेकडे घेऊन जाते. तावडे लिहितात, 'मराठा समाजाच्या उन्नतीसाठी डोंगराएवढे काम केलेल्या गंगारामभाऊ म्हस्के हे मराठा समाजाचे एक आद्य नेते ठरतात; पण बहुजन समाजासाठी काम करणाऱ्या मंडळीची ओळख पुढील पिढीस नीटशी होऊ शकली नाही, हाही इतिहास आहे. गंगारामभाऊ एक कर्मवीर होते. पुणेकर अनेक माणसांचा इतिहास सांगितला जातोय. तो सांगितलाच पाहिजे; पण त्यांनी फक्त स्वतः-पलीकडची गुंतवणूक म्हणून समाजाच्या उत्कर्षासाठी आयुष्य झोकून दिले, त्यांचे छोटे चरित्रही एवढ्या काळात उपलब्ध होऊ नये, ही बहुजन कर्मवीरांची खरी परवड आहे. त्यात गंगारामभाऊ लेखक नव्हते, बोलघेवडे वक्ते नव्हते, त्यामुळे त्यांचे बोलणे विचारही आज समाजासमोर आले नाहीत. मराठा समाजाच्या शैक्षणिक उत्कर्षासाठी पुढे अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद ही संस्था उदयास आली; पण तत्पूर्वी

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २४