पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सर्वसमावेश गंगारामभाऊ
 गंगारामभाऊ म्हस्के आणि सयाजीराव गायकवाड यांच्या व्यक्तिमत्त्वात समान असणारा गुण म्हणजे सर्वसमावेशकता होय.गंगारामभाऊ हाडाचे सत्यशोधक होते परंतु त्यांनी आपल्या कार्यात रानडे, गोखले, टिळक यांसारख्या पुण्यातील महत्त्वाच्या नेत्यांचा आपल्या कामात कौशल्याने उपयोग करून घेतला.बहुजनांच्या कल्याणाचा ध्यास असला तरी ते ब्राह्मणद्वेषाने पछाडलेले नव्हते.सयाजीरावसुद्धा वैचारिकदृष्ट्या सत्यशोधक बाण्याचे होते,परंतु त्यांनीसुद्धा सर्व जातीधर्माच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार पाठबळ दिले.

 न्या.रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि बाळ गंगाधर टिळक हे पुण्यातील तीन महत्त्वाचे नेते गंगारामभाऊंचा वारंवार सल्ला घेत. गंगारामभाऊ म्हस्के हे किती मोठे होते हे समजण्यासाठी वरील उदाहरण पुरेसे आहे. यासंदर्भात तावडेंनी नोंदवलेले निरीक्षण बोलके आहे. ते म्हणतात, 'कै. म्हस्के यांची योग्यता फार मोठी होती. त्या वेळच्या पुढारीवर्गात त्यांचे वजन बरेच होते. कै. नामदार गोखले, लो. टिळक वगैरे पुढारी मंडळी त्यांचा वेळोवेळी सल्ला घेत असत. कै. म्हस्के यांनी जातीविशिष्ट संस्था स्थापन केली होती तरी त्यांनी आपल्या संस्थेविषयी इतर जातींच्या लोकांची सहानभूती कशी मिळवली होती, ते या संस्थेच्या पूर्वेतिहासावरून चांगले कळून येते.'महाराष्ट्रातील

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १९