पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 म्हणूनच भास्करराव जाधव म्हणतात, 'पुणे येथे गंगारामभाऊ म्हस्के हे विद्वान मराठे वकिली करीत असत व ब्राह्मणेतर समाजात त्यांचे चांगले वजन होते. त्यांना सत्यशोधक तत्त्वे पटली होती. पण समाजात विद्याप्रसार होऊन खरे खोटे समजण्याची पात्रता त्यांच्या अंगी आल्याशिवाय धार्मिक बाबतीत बंड करण्याची ताकद येणार नाही, यासाठी शिक्षण प्रसाराचे - विशेषत: इंग्रजी शिक्षण प्रसाराचे काम अगोदर हाती घेतले पाहिजे असे त्यांचे म्हणणे होते. आमचा समाज दरिद्री असल्याने व इंग्रजी शिक्षण बऱ्याच खर्चाचे असल्याने मुलांस स्कॉलरशिप देऊनही पैशाची ही अडचण प्रथम दूर केली पाहिजे. शिक्षण प्रसार बऱ्याच प्रमाणावर झाला म्हणजे भट्टी धार्मिक वर्चस्व आपोआप नाहीसे होईल, असे ते प्रतिपादित म्हणून त्यांनी या कामाचे महत्त्व पटलेल्या इतर गृहस्थांच्या साहाय्याने डेक्कन असोसिएशन या नावाची मंडळी सन १८८५ साली स्थापिली व फंड जमविण्यास सुरुवात केली. थोड्याच दिवसांत श्रीमंत सयाजीराव गायकवाड महाराज बडोदे यांना या असोसिएशनचे महत्त्व व कार्यदिशा पटली व त्यांनी २४०० रुपयांचे वर्षासन सुरू केले.'

 यासंदर्भात डॉ. रमेश जाधव म्हणतात, 'न्या. रानडे यांच्या प्रेरणेने मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी 'डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन' निर्माण झाली होती. या संस्थेचे प्रमुख गंगारामभाऊ म्हस्के हे होते. म्हस्के यांच्या विनंतीवरूनच शाहू छत्रपतींनी या संस्थेला कोल्हापूर दरबारमार्फत ३० रुपयांचे वर्षासन मंजूर केले होते.'

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १८