पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक महान पण दुर्लक्षित सुधारक विठ्ठल रामजी शिंदे यांच्या फर्ग्युसन कॉलेजमधील शिक्षणासाठीसुद्धा गंगारामभाऊंच्या डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची शिष्यवृत्ती होती.१८९३ पासून पहिली तीन वर्षे म्हस्केंची दरमहा १० रु. शिष्यवृत्ती आणि १८९६ पासून पुढे पाच वर्ष सयाजीरावांच्या दरमहा २५ रु. च्या शिष्यवृत्तीवर शिंद्यांचे शिक्षण झाले होते.

 शिष्यवृती मिळवण्यासाठी शिंदे जेव्हा पहिल्यांदा म्हस्केना भेटायला गेले तेव्हाची आठवण शिंदेंनी आपल्या आत्मचरित्रात नोंदवली आहे. शिंदे म्हणतात, 'गंगारामभाऊ म्हस्के या गृहस्थाचे मराठा जातीवर मोठे उपकार आहेत. त्या काळचे एक फरडे इंग्रजी शिकलेले, सुधारकी बाण्याचे हुशार वकील अशी त्यांची प्रसिद्धी होती. पुणे लष्करात मेन स्ट्रीटवर त्यांचे मोठे चांगले स्वतः चे घर आहे. रानडे भांडारकर वगैरेसारखी त्या काळच्या सुधारक पक्षात त्यांची चांगली मान्यता होती. वकिलीत त्यांनी बरेच पैसे मिळवले होते. हिराबागेत असलेल्या कॉस्मॉपॉलिटन क्लबच्या दिवाणखान्यात पुण्याच्या तत्कालीन मोठमोठ्या माणसांच्या मोठमोठ्या तैल- तसबिरी टांगल्या आहेत, त्यात त्यांचीही एक तसबीर अद्याप लटकत आहे. त्यांची मराठा संस्थानिक, राजे व इतर जातीचे प्रागतिक शिक्षणप्रेमी श्रीमंत गृहस्थ यांच्यामध्ये त्या काळी छाप होती.'

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / २०