पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सरकारास डेप्युटेशचा उद्देश सांगितला. डेप्युटेशनचा उद्देश हा होता की, मराठे लोकांची, त्यांस विद्या नसल्यामुळे किती शोचनीय स्थिती झाली आहे हे श्रीमंतास विदित आहेच. तरी मराठ्यांच्या गरीब व होतकरू मुलांस हायस्कूलचे शिक्षण मिळण्याकरिता त्यांस स्कॉलरशिप दिल्या पाहिजेत. या कामाकरिता आम्ही एक फंड काढला आहे, त्यास श्रीमंतांनी हातभार लावावा.'

 सयाजीरावांनी या शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून घेऊन अर्थसाहाय्य सुरू केले. या संस्थेचे महाराष्ट्रासाठीचे महत्त्व ओळखून १८८५ पासून ते १९३९ पर्यंत अशी ५४ वर्षे अखंडपणे आर्थिक पाठबळ सयाजीरावांनी दिले. ही मदत ५ लाख २९ हजार ५५६ रु. इतकी होती. आजच्या रुपयाच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य ७२ कोटी ४५ लाखांहून अधिक होईल. मराठा जातीच्या शैक्षणिक उन्नतीसाठी आधुनिक काळात सयाजीरावांनी जेवढे प्रयत्न केले तेवढे आजतागायत कोणीही केलेले नाहीत. यामध्ये गंगारामभाऊंची डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशन हे एक प्रमुख माध्यम होते. यासंदर्भात २३ जानेवारी १८८६ ला खासेराव जाधवांना लंडनला लिहिलेल्या पत्रात सयाजीराव म्हणतात, ‘आपल्या समाजाला शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून पुण्यात स्थापन झालेल्या एका मराठा संस्थेला आम्ही दरमहा दोनशे रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. आमचा हेतू पूर्ण होण्याच्या दृष्टीने ते अनुदान उपयुक्त ठरेल, अशी आशा आहे.'

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १७