पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीवर शिकलेल्या महाराष्ट्रातील कर्तबगार लोकांची यादी हजारात जाईल. १८८३ ते १९३५ या ५२ वर्षांत गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीद्वारे ३३८ मराठे पदवीधर झाले. आजही ही संस्था कार्यरत आहे. तिचा पत्ता पुढीलप्रमाणे- ९९९, म्हस्के स्मारक मंदिर, हिरा बाग, लोकमान्य बाल गंगाधर टिळक रोड, सारस्वत सह. बँकेच्या वर, शुक्रवार पेठ, पुणे. बहुजनांच्या शिक्षणासाठी १८८३ पासून आजअखेर १३५ वर्षे कार्यरत महाराष्ट्रात किती संस्था आहेत? हा मुद्दासुद्धा विचार करण्यासारखा आहे. परंतु महाराष्ट्रात याबाबत पूर्ण अज्ञान असल्यामुळे म्हस्केंचे योगदान महाराष्ट्राला माहीत नाही आणि बगाडेंसारखे संशोधक गंगारामभाऊंवर अन्याय करताना दिसतात. विठ्ठल रामजी शिंदे, भास्करराव जाधव, वासुदेव लिंगोजी बिर्जे, पांडुरंग चिमाजी पाटील, रामचंद्र शामराव माने- पाटील, दाजीराव विचारे, शाहू महाराजांनी करवीरपीठाचे क्षात्रगुरू म्हणून ज्यांची नेमणूक केली ते सदाशिव पाटील बेनाडीकर, दत्तात्रय रामचंद्र भोसले, सीताराम तावडे, इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांसारखे शेकडो कर्तबगार लोक गंगारामभाऊंच्या शिष्यवृत्तीमुळे पुरोगामी महाराष्ट्र घडवू शकले याचे भान आपल्याला ठेवावे लागेल. या लोकांनी केलेले शैक्षणिक कार्य मराठ्यांबरोबर अस्पृश्य जातींच्या उद्धारालाही उपकारक ठरले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पन्नास

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १४