पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विद्यापीठातून पदवीधर झाले. त्यांनी कोल्हापुरात सत्यशोधक चळवळ रुजवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली. १८९८ ते १९२१ अशी २३ वर्षे त्यांनी कोल्हापुरातील सर्व पुरोगामी चळवळींना बौद्धिक नेतृत्त्व दिले. कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा वकील खंडेराव बागल हे डेक्कन मराठा एज्युकेशन असोसिएशनच्या शिष्यवृत्तीवर शिकले होते. शाहू महाराजांनी त्यांना न्यायाधीशपदी नेमले होते. शाहू महाराजांनी १९०१ मध्ये सुरू केलेल्या मराठा बोर्डिंग या पहिल्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी पी. सी. पाटील, मराठा जातीतील पहिले इंजिनिअर दाजीराव अमृतराव विचारे हे कोल्हापूर संस्थानात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर होते. शाहू महाराजांच्या मराठा बोर्डिंगच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळणारे जिवाजीराव सावंत, शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्रजगद्गुरुपीठाचे पहिले जगद्गुरू सदाशिवराव पाटील बेनाडीकर, शाहू महाराजांच्या पहिल्या वसतिगृहाचे पहिले विद्यार्थी पी. सी. पाटील, कोल्हापूर संस्थानातील पहिले मराठा न्यायाधीश खंडेराव बागल हेसुद्धा डेक्कन मराठाच्या शिष्यवृत्तीवर शिकलेले होते. महत्त्वाचे म्हणजे या सर्व लोकांनी फक्त मराठा जातीसाठी नाही तर सर्व बहुजनांच्या कल्याणाचे काम केले. या उदाहरणावरून गंगारामभाऊंचे काम किती मूलभूत होते हे स्पष्ट व्हावे.

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / १३