पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांचे अध्यक्षीय भाषण वाचून दाखवले. त्यांच्या या भाषणाचे कौतुक करताना केसरी वृत्तपत्र लिहिते, "प्रख्यात साहित्यसेवक श्री. कृ.अ. केळुसकर यासारखा ज्ञानतपोवृद्ध आणि वयोवृद्ध अध्यक्ष संमेलनास लाभल्याने संमेलनाचा तो एक प्रकारे गौरवच झाला. आधुनिक साहित्य सेवकांत श्री. केळुसकर यांचा दर्जा त्यांचे अध्यक्षीय भाषण त्याला साजेसे झाले. "
 या संमेलनानंतर अवघ्या आठवडाभरातच १४ ऑक्टोबर १९३४ रोजी केळुसकरांचे मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेवेळी केलेल्या शोकपर भाषणात सी. के. बोले म्हणतात, “ मागासलेल्या वर्गाचे ते एक मोठे हितकर्ते होते. त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी जितके प्रयत्न केले तितके अद्याप कुठल्याही पुढाऱ्याने केलेले नाहीत. ते जर पुढारलेल्या समाजात जन्माला आले असते तर त्यांचे देव्हारे माजविण्यात आले असते." तर डॉ. आंबेडकरांचे सहकारी सीताराम शिवतरकर आपल्या मनोगतात म्हणतात, “मागासलेल्या लोकांपेक्षा आम्हा अस्पृश्य वर्गाची कामगिरी गुरुवर्य केळुसकर यांनी जास्त केली आहे. वेळोवेळी सल्लामसलत देऊन व योग्य मार्ग दाखवून त्यांनी आमची मोठी कामगिरी केली. त्यांच्यामुळेच आम्हाला डॉ. आंबेडकरांसारखा एक अखिल भारतीय पुढारी अस्पृश्य वर्गाला मिळाला. केळुसकर व डॉ. आंबेडकर यांची जर ओळख झाली नसती तर डॉ. आंबेडकर साध्या नोकरीत राहिले असते."

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ५०