पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मात्र म्हणण्यासारखा झाला नाही. कारण प्रकाशक नागवेकर भंडारी तर ग्रंथकर्ता मराठा. धर्मशास्त्राप्रमाणे यांना वेद व वेदांत यांच्या अध्ययनाचा अधिकार नाही. त्यामुळे तो ग्रंथ वरिष्ठ सुशिक्षित समाजाने वाचवायचा कसा?
 अशा तऱ्हेचा कोणी अब्राह्मणाने खटाटोप केला, तर 'केसरी' कार टिळक केसरीतून काय म्हणत हे पाहण्यासारखे आहे. १ ऑक्टोबर १९०९ रोजी 'केसरी' कार टिळक काय म्हणतात ते पाहा, “आज हे विचार सुचण्याचे कारण बडोदा येथे श्रीमत्स्वामी हंसस्वरूप यांनी राजमहालात श्री. गायकवाड सरकार यांच्यासमोर जी व्याख्याने दिली, त्यानंतर महाराजांनी जे एक लांबलचक तासभर वेदांतावर व्याख्यान दिले हे होय; पण कोणीही संस्थानिक कितीही सुशिक्षित असला तरी त्याने ज्या विषयावर त्यास बोलण्याचा अधिकार नाही, त्यासंबंधाने त्याने अद्वातद्वा विचार प्रकट केल्यास ते उपहासास पात्र होतील.”
 केळुसकरलिखित भगवद्गीतेवरील ग्रंथाचा प्रसार न होण्याचे कारण सांगताना धनंजय कीरांनी उल्लेख केलेला सयाजीराव महाराज आणि स्वामी हंसस्वरूप यांच्या संदर्भातील प्रसंग मुळातून समजून घेण्यासारखा आहे.
महाराजा सयाजीराव आणि स्वामी हंसस्वरूप
 सप्टेंबर १९०१ मध्ये हिंदू धर्माचे अधिकारी भाष्यकार म्हणून नावाजलेल्या स्वामी हंसस्वरूप यांच्या दहा जाहीर व्याख्यानांचे बडोद्याच्या दसरा चौकात आयोजन करण्यात आले होते.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३३