पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरुवातीला ‘आध्यात्मिक ज्ञानरत्नावली' मासिकातून क्रमशः प्रसिद्ध करण्यात आला होता. तोपर्यंत भगवद्गीतेचा महाराष्ट्रात तितकासा प्रसार व प्रचार झाला नसल्यामुळे 'गीते'च्या स्पष्टीकरणार्थ व टीकात्मक असे ग्रंथ निर्माण झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर केळुसकरांनी आपल्या ग्रंथात गीतेतील प्रत्येक श्लोकावर वामन, मुक्तेश्वर, मोरोपंत, तुकाराम व उद्धवचिन यांनी केलेले पद्यमय स्पष्टीकरणाचे संकलन केले होते. त्यामुळे गीतेतील श्लोकांचे विविध व्यक्तींनी केलेले विश्लेषण समजून घेणे वाचकाला शक्य झाले. याचबरोबर केळुसकरांनी आपल्या ग्रंथामध्ये स्वतंत्रपणे गीतेचे टीकात्मक विश्लेषण केले होते. विशेष बाब म्हणजे ग्रंथाच्या अखेरीस केळुसकरांनी भगवद्गीतेच्या त्यांना उमगलेल्या रहस्याचे विवेचन केले होते. या ग्रंथात केळुसकरांच्या धर्मशास्त्र आणि वेदांतविषयक पांडित्याची प्रचिती येते.
 केळुसकरांच्या या ग्रंथावर अभिप्राय देताना 'केरळ कोकीळ' कर्ते लिहितात, "एकंदरीत गीतेवर आजपर्यंत मराठीत जितक्या म्हणून टीका आहेत. त्या सर्वांमध्ये ही पहिल्या प्रतीची आहे." त्यांचा हा अभिप्रायच केळुसकरांच्या कामाचे अनन्यत्व स्पष्ट करतो. असाच अभिप्राय 'बोधसुधारक' नियतकालिकाने नोंदवला आहे. दुर्दैवाने केळुसकरलिखित हा ग्रंथ महाराष्ट्राला माहीत नाही. यामागची कारणमीमांसा करताना धनंजय कीर लिहितात, “श्रीमद्भगवतगीता" या केळुसकरकृत ग्रंथाचा खप

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३२