पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्यातील सनातनी मंडळींनी आयोजित केलेल्या या व्याख्यानांचा बडोदेकरांवर खूपच प्रभाव पडला. या भाषणांची कौतुकमिश्रित चर्चा महाराजांच्या कानावर गेली. महाराजांनी ही भाषणे ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. या इच्छेनुसार स्वामी हंसस्वरूप या उच्चशिक्षित हिंदू धर्मपंडितांच्या परंपरावादी हिंदू धर्माचा पुरस्कार करणाऱ्या पाच व्याख्यानांचे आयोजन २२ ते २६ सप्टेंबर १९०१ या दरम्यान सयाजीराव महाराजांसाठी लक्ष्मीविलास राजवाड्यातील आयने महाल दिवाणखाण्यात रात्री ९ ते १०.३० या वेळेत करण्यात आले. विशेष म्हणजे या व्याख्यानासाठी प्रमुख ४००-५०० लोकांना निमंत्रित करण्यात आले होते.
 स्वामी हंसस्वरूप हे उच्चशिक्षित विद्वान होते. परंतु सनातनी हिंदू धर्माचा ते टोकाचा अभिमान बाळगत होते. धर्मातील 'जैसे थे वादी' तत्त्वज्ञानाचा त्यांचा आग्रह विज्ञानवादी सयाजीरावांना पटला नाही. या पाच भाषणांना हजर राहून महाराजांनी स्वामी हंसस्वरूप यांची भूमिका समजून घेतली. स्वामी हंसस्वरूप यांच्या शेवटच्या भाषणाच्या अध्यक्षीय समारोपात महाराजांनी उपस्थितांना स्वामींच्या भाषणाबद्दल कोणाला बोलायचे असल्यास बोलावे असे आवाहन केले. श्रोत्यांपैकी कोणीच काही बोलत नाही हे पाहून उत्स्फूर्तपणे आपले आक्षेप नोंदवत स्वामी हंसस्वरूप यांचा प्रतिवाद करणारे २ तासांचे भाषण केले ते रात्री साडेबारा वाजेपर्यंत चालले. हंसस्वरूप यांचे सर्व

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / ३४