पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि ग्रंथ लिहिण्याचे काम ब्राह्मणांनाच चांगले येते असा जरी सामान्यत: समज होता तरी मला हे काम दिले आणि माझी ग्रंथकारांमध्ये गणना होण्याचा योग आणून दिला. याबद्दल त्या थोर महाराजांचा मी आमरण आभारी झालो."
 केळुसकरांकडून महाराष्ट्राची जी लेखनसेवा झाली ती महाराष्ट्रासारख्या ‘पुरोगामी' राज्यात आजअखेर अज्ञात कशी काय राहिली याचे आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर लगेचच मराठी भाषेला ज्ञानभाषा करण्यासाठी लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना केली. या मंडळाने प्रकाशित केलेल्या विश्वकोशातही शिवाजी महाराजांचे पहिले आणि विश्वसनीय मराठी चरित्र लिहिणाऱ्या केळुसकरांच्या संदर्भातील नोंद सोडा, केळुसकरांचा साधा उल्लेखही नाही ही महाराष्ट्रासाठी वेदनादायी बाब आहे.
 'फ्रान्सचा जुना इतिहास' या ग्रंथाचे भाषांतर सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा करार होता. केळुसकरांनी हा सहा महिन्यांचा कालावधी वाढवून नऊ महिन्याचा करून घेतला. याचे कारण म्हणजे, केळुसकरांप्रमाणेच त्यांचे मित्र सिमिअन बेन्जामिन यांना दिवाणांच्या शिफारशीवरून सयाजीरावांनी 'मार्कस् ऑरेलिअसची बोधवचने' भाषांतरित करण्याचे काम दिले होते. बेन्जामिन यांनी केळुसकरांकडून या ग्रंथाच्या भाषांतरास मदत करण्याचे वचन घेतले होते. दोन्ही पुस्तकांचा अनुवाद करण्यास

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २३