पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 धामणस्करांना केळुसकरांची लेखणी चांगली परिचित होती. त्याचबरोबर धामणस्करांचा आणि केळुसकरांचा 'भूतांच्या अस्तित्वा'बाबत रामय्या शेठ यांच्या घरी वाद झाला होता. त्या वादामध्ये केळुसकरांनी नास्तिकपक्ष उत्तम प्रकारे मांडला होता. धामणस्करांनी सयाजीराव महाराजांना केळुसकरांचा हा किस्सा सांगितला. त्यावरून सयाजीरावांनी केळुसकरांना आपल्या भेटीस बोलवण्यास सांगितले. सयाजीराव आणि केळुसकर यांच्यातील ही भेट मुंबई येथे झाली. त्यावेळी महाराजांनी केळुसकरांची परीक्षा घेतली. चतुरस्र वाचनामुळे सयाजीरावांच्या या परीक्षेत केळुसकर पास झाले.
 महाराजांनी केळुसकरांना 'द स्टोरी ऑफ नेशन' या इतिहास मालेतील 'फ्रान्सचा जुना इतिहास' या पुस्तकाचे भाषांतर करण्याची संधी दिली. या प्रकल्पातील बारा ग्रंथांच्या अनुवादापैकी केळुसकरांनी केलेला 'फ्रान्सचा जुना इतिहास' या पुस्तकाचा अनुवाद सर्वात उत्तम ठरला. त्यामुळे त्यांना विशेष पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. केळुसकरांचा हा पहिला ग्रंथ बडोदा सरकारने प्रकाशित केला होता. अशा प्रकारे इतिहास लेखक केळुसकरांचा पाया बडोद्यातच घातला गेला. महाराजांशी भेट घालून देणाऱ्या धामणस्करांसंदर्भात केळुसकर लिहितात, “त्या दयाळू साहेबांनी महाराजांकडे माझ्या योग्यतेसंबंधाने बोलून मला बारा ग्रंथांपैकी एक देण्याविषयी भलावण केली. हा त्यांचा माझ्यावर मोठा उपकार झाला

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २२