पान:महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळूसकर.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रभाव असणाऱ्या ग्रंथाचा केलेला मराठी अनुवाद क्रमशः प्रकाशित झाला. महात्मा फुलेंवर या ग्रंथाचा सर्वाधिक प्रभाव होता असे फुलेवादी परंपरा गेली ६० वर्षे आपल्याला सांगत आली. परंतु या ग्रंथाचा मराठी अनुवाद करण्याची 'बुद्धी' मात्र तिला झाली नाही. या पार्श्वभूमीवर १८९३ पूर्वी महात्मा फुलेंच्या १८९० मधील मृत्यूच्या पार्श्वभूमीवर केळुसकरांनी केलेला हा अनुवाद महत्त्वाचा होता. परंतु आपण फुलेंच्या पलीकडची फुले परंपरा स्वीकारली नाही आणि तिच्याशी जोडून घेऊन उन्नत करण्याचा प्रयत्नही केला नाही. हेच केळुसकरांबाबतच्या आपल्या अज्ञानातून प्रतीत होते.
फ्रान्सचा जुना इतिहास
 १८९३ मध्ये सयाजीराव महाराजांनी 'द स्टोरी ऑफ नेशन' या इंग्रजीतील इतिहास मालेचा अनुवाद करण्याचा मोठा प्रकल्प आखला. महाराजांनी या मालेतील बारा ग्रंथांचे भाषांतर करण्याची जबाबदारी मोठमोठ्या विद्वानांवर सोपविली. यावेळी रामचंद्र विठोबा धामणस्कर हे बडोद्यात दिवाण होते. धामणस्कर आणि केळुसकर यांच्याशी शेठ व्यंकय्या अय्यावारू यांचे मैत्रीचे संबंध होते. अय्यावारू यांनी धामणस्करांकडे सयाजीराव महाराज भाषांतरासाठी जी पुस्तके देत आहेत त्यापैकी एक पुस्तक केळुसकरांना भाषांतर करण्यास देण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.

महाराजा सयाजीराव आणि कृष्णराव अर्जुन केळुसकर / २१