पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



मराठा एज्युकेशन असोसिएशन, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, बडोद्यातील मराठा शिक्षण फंड अशा विविध मार्गांनी सयाजीरावांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक विकासाला बळ दिले. महाराजांचे हे योगदान महाराष्ट्रासाठी नवे आहे कारण आपल्या पुरोगामी परंपरेने या मूलभूत इतिहासाकडे कमालीचे दुर्लक्ष केले.
 कर्मवीर भाऊराव पाटील आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे नातेसुध्दा महाराष्ट्रासाठी पूर्णत: अज्ञात आहे. कर्मवीर त्यांच्या उमेदीच्या काळात कोल्हापुरात शाहू महाराजांच्या सहवासात वाढले होते. त्यामुळे कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शैक्षणिक कामाची प्रेरणा शाहू महाराज आहेत असे सांगण्याची प्रथा महाराष्ट्रात रूढ आहे. परंतु हे अर्धसत्य आहे. कारण कर्मवीरांनी स्थापन केलेल्या पहिल्या बोर्डिंगला त्यांनी राजर्षी शाहूंचे नाव दिले होते. परंतु अस्पृश्यांसह बहुजनांच्या शिक्षणाचे कार्य करण्याची प्रेरणा त्यांना सयाजीरावांचे भाषण ऐकून मिळाली होती. कर्मवीरांनी स्वतः जाहीर भाषणात या बाबीचा उल्लेख केला होता. परंतु आपण मात्र कर्मवीरांचे हे भाषण पुरेशा गांभीर्याने घेतले नाही.

 कर्मवीर भाऊराव पाटील हे १९०२ ते १९०९ या कालावधीत शिक्षणानिमित्त कोल्हापुरात वास्तव्यास होते. यादरम्यान त्यांच्यावर बहुजनांच्या शिक्षणाचा पहिला संस्कार झाला. शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या जैन बोर्डिंगचे ते विद्यार्थी होते. कोल्हापुरातील हा काळ वेदोक्ताच्या निमित्ताने ब्राह्मण-ब्राह्मणेतर

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / ७