पान:महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यावेळी माझ्या मनाचा मी असा संकल्प केला होता की,या राजर्षीचे पाय वाटेल ते करून माझ्या झोपडीस लागतील असे मी करीन आणि तो माझा संकल्प सिद्धीस गेल्याचे पाहून मला किती आनंद होत असेल याची कल्पना आपण सर्वांनी करावी.”
 “महाराज, आपण थोर विभूति असून, आपल्या विलक्षण राज्यपद्धतीमुळे व राजकारणपटुत्वामुळे फक्त हिंदुस्थानच नव्हे तर अखिल दुनियेचे डोळे आपल्याकडे वेधून घेतले आहेत. त्याशिवाय आपण कट्टे सुधारक व उच्चतम कोटीतील देशभक्त आहात. १९०६ साली मी आपले अस्पृश्योद्धारासंबंधीचे भाषण वाचले व त्या भाषणाने माझ्या मनामध्ये अतिशय खळबळ उडवून दिली. मी तेव्हाच निश्चय केला की, श्रीमंत महाराजांनी दर्शविलेल्या विचाराप्रमाणे व व्यक्त केलेल्या ध्येयास अनुसरून आजन्म प्रयत्न करावयाचा, उपजीविकेस साधन म्हणून नोकरी करून जे काही पैसे शिल्लक राहतील ते हीन मानलेल्या लोकांस ज्ञान देऊन त्यांना पुढे आणण्यामध्ये खर्च करावयाचे. या हेतूने मी काही दिवस नोकरीही केली, परंतु त्या व्यवसायामुळे माझे ध्येय बरोबर मला गाठता येईना, म्हणून नोकरीवर मी तिलांजली दिली व प्रस्तुतचे कार्य अंगावर घेतले.”

 “माझ्या कार्यास दिवंगत श्री. शाहू छत्रपती महाराज यांचा पूर्ण पाठिंबा होता. त्यांना मी माझे विचार दर्शविले, तेव्हा त्यांनी आपली सहानुभूती व्यक्त केली. मी भिक्षा मागण्याच्या पद्धतीच्या विरुद्ध प्रथमपासूनच आहे. म्हणून मी त्यांच्याजवळ

महाराजा सयाजीराव आणि कर्मवीर भाऊराव पाटील / १०