पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रासायनिक उद्योग
 टी. के. गज्जर यांच्या रुपाने बडोदा संस्थानाला तत्कालीन सर्वोत्तम रसायनशास्त्रज्ञांपैकी एक शास्त्रज्ञ लाभला. गज्जर यांच्या मार्गदर्शनाखाली कोटीभास्कर यांनी स्पिरिट निर्मितीचा कारखाना उभारण्याची योजना आखली. सयाजीराव व रोमेश चंद्र दत्त यांच्याशी संपर्क साधून कोटीभास्कर यांनी बडोद्यात स्पिरिट निर्मितीचा कारखाना उभारण्यासाठी सवलतीची मागणी केली. सयाजीरावांनी नवीन उद्योगासाठी आवश्यक सवलती मंजूर केल्यानंतर १९०५ मध्ये बडोदा येथे स्पिरिट निर्मिती कारखान्याची स्थापना झाली. या कारखान्याच्या प्रगतीतूनच पुढे अलेम्बिक केमिकल वर्क्स कंपनी नावारुपाला आली.

 अलेम्बिक केमिकल्स वर्क्स कंपनीची स्थापना करताना पुढील उद्दिष्टे ठरविण्यात आली होती. १) भारतात रासायनिक व इतर उद्योगांचा विकास करणे. २) अत्याधुनिक साधनांनी युक्त प्रयोगशाळेची स्थापना करणे आणि या प्रयोगशाळेत विविध प्रकारचे संशोधन करणे. ३) स्पिरिट, औषधे, सुगंधी द्रव्य, महूची फुले इ. वस्तूंची खरेदी, विक्री आणि उत्पादन करणे. इ. १९३८ मध्ये बडोदा सरकारने अलेम्बिक केमिकल वर्क्स कंपनीला कॅफेन, स्ट्रीचनाईन इ. अल्कोलॉईड्सच्या निर्मितीसाठी आवश्यक प्रयोग करण्याची परवानगी दिली. या कंपनीच्या माध्यमातून बडोद्यात विविध रसायनांच्या निर्मितीसाठी अनेक मूलभूत प्रयोग केले गेले.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३७