पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या राष्ट्रीय प्रकल्पाला तुमचा हातभार लागावा अशी अपेक्षा आहे.' टाटांनी सयाजीरावांची ही सूचना मान्य केली. त्यानुसार द्वारका बंदराजवळ मिठागर येथे 'टाटा केमिकल्स' उभारणीसाठी महाराजांनी जागा उपलब्ध करून दिली. तसेच कारखान्याचे शेअर्स खरेदी करून मदत केली. त्यामुळे अवघ्या दोनच वर्षात १९३९ मध्ये मिठापूर येथे टाटा केमिकल या कंपनीची स्थापना झाली. पुढे या कंपनीमध्ये कपिलराम व त्याच्या सहकाऱ्यांनी सोडा ॲश बनवण्याच्या कृतीचे रहस्य शोधून काढले आणि अशाप्रकारे पोलाद व विद्युत निर्मितीच्या खालोखाल सर्वात महत्त्वाचा रसायन उद्योगाचा पाया घातला गेला. त्यामुळे बडोदा संस्थानातील दुष्काळी भागातील हजारो तरुणांना रोजगारदेखील उपलब्ध झाला.

 इंग्रज कंपनीकडून कोळसा घ्यावा असा अलिखित नियम असतानासुद्धा बडोदा संस्थानातील रेल्वेसाठी 'टाटा आयर्न वर्क' कंपनीकडून २२ ऑगस्ट १९१९ रोजी कोळसा विकत घेण्यास सयाजीराव महाराजांनी मंजुरी दिली. नवसारी भागातील जे.एन. टाटा औद्योगिक संस्थेला (हुन्नर शाळा) महाराजांनी इ.स. १९२१- २२ पासून ३,४०० रुपये वार्षिक मदत केली. तर महाराजांच्या मृत्यूपर्यंत (इ.स. १९३९ ) ६८,००० रुपये दिले होते. यावरून महाराजांनी केलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्यातून टाटा उद्योग समूह उभा राहण्यात असणारे बहुमोल योगदान स्पष्ट होते.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३६