पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बडोद्याचे ओखाबंदर
 १९३०-४० याच कालखंडातील राज्यातील उद्योग आणि व्यापाराच्या वेगवान विकासामधील आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे ओखा बंदराचा केलेला विकास होय. १८८२ मध्ये रॉयल इंडियन मरीनने ओखा बंदराचे सर्वेक्षण केले होते. परंतु याचे वास्तविक काम मात्र १९२२ पूर्वी सुरू होऊ शकले नाही. मात्र यामध्ये सयाजीराव महाराजांनी विशेष लक्ष देऊन १९२५ साली ओखा बंदराचे काम केले. हे बंदर १९२७ मध्ये खुले केले गेले. गुजरात प्रांत व देशभरात जाणाऱ्या वस्तूंच्या व्यापारावर भारत सरकारकडून सीमाशुल्क आकारले जाऊ लागले. त्यामुळे बडोदा सरकारच्या महसुलामध्ये घट होऊ लागली. यामुळे बडोदा सरकारने भारत सरकारबरोबर या सीमाशुल्काच्या आकारणी बाबत बोलणी सुरू केली. १९३६ मध्ये बडोदा सरकारचा भारत सरकारबरोबर एक करार झाला. यामध्ये खालीलप्रमाणे काही ठळक बाबी ठरविण्यात आल्या.
 १) राज्यातील बंदरावर परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंवरील आयात कराच्या माध्यमातून शासन महसूल गोळा करेल. हा महसूल आयात केलेल्या वस्तू राज्यामध्ये विकल्यानंतर मिळणाऱ्या महसुला इतकाच असेल.

 २) ब्रिटिश भारतीय बंदरावर आयात करण्यात आलेल्या आणि तेथे सीमाशुल्क आकारल्या जाणाऱ्या परदेशी वस्तूंना राज्यांच्या प्रांतात विनाशुल्क प्रवेश दिला जाईल आणि राज्याच्या बंदरावर

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३८