पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



व्यापार, उद्योग व कृषी सल्लागार समिती
 शाश्वत औद्योगिक विकास होण्यासाठी उद्योग विकासाचे प्रयत्न योग्य दिशेने होणे आवश्यक होते. सयाजीरावांनी १९१३ मध्ये व्यापार, उद्योग व कृषी क्षेत्राच्या विकासासाठी सल्ला देणारी सल्लागार समिती नेमली. या समितीमध्ये एकूण २२ सदस्य होते. बडोद्यात उद्भवणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या सोडवणुकीसाठी बडोदा सरकारला सल्ला देणे हे या सल्लागार समितीचे मुख्य कार्य होते. औद्योगिक सल्लागार समितीची चौथी वार्षिक बैठक १ व २ जुलै १९२० रोजी बडोदा येथे पार पडली. या बैठकीत बडोद्याचे तत्कालीन दिवान मनुभाई मेहता यांनी बडोदा संस्थानाकडून औद्योगिक विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध धोरणांमुळे औद्योगिक गुंतवणूकदारांमध्ये विश्वासाची भावना निर्माण होऊन मुंबई व अहमदाबाद येथील मोठे भांडवलदार बडोद्यात गुंतवणुकीसाठी आकर्षित झाल्याचे सांगितले. या सल्लागार समितीचे अध्यक्ष हे तुरुंग उद्योग सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांच्या सूचनेनुसार केंद्रीय तुरुंगात रेशीम विणकाम उद्योग सुरू करण्यात आला.
बडोद्यातील उद्योगविषयक कायदे

 सयाजीरावांनी बडोदा संस्थानातील उद्योगधंद्यांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक विशेष कायदेदेखील केले. यातील प्रमुख कायदे म्हणजे कंपनीज अॅक्ट (१८९७),

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३०