पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बॉयलर अॅक्ट (१८९८), कस्टम अॅक्ट (१९०४), वेट अॅण्ड मेजर्स अॅक्ट (१९०४), रुल्स फॉर ओपनिंग फॅक्टरीज अँड द ॲक्विजिशन ऑफ लँड (१९०४), मायनिंग अॅक्ट (१९०८), फॅक्टरीज अॅक्ट (१९१३), रुल्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिज (१९१५), ट्रेड युनियन अॅक्ट (१९३८) इ. या कायद्यांच्या माध्यमातून कारखानदार, भांडवलदार आणि कामगार या तिघांमध्ये परस्पर समन्वय साधने शक्य झाले. परिणामी उद्योग विकासाला गती मिळाली.
हातमाग विणकाम उद्योग

 विणकाम उद्योग हा संपूर्ण बडोदा संस्थानमध्ये विस्तारलेला महत्त्वपूर्ण कुटिरोद्योग होता. बडोदा संस्थानातील बडोदा व गणदेवी ही शहरे पारंपरिक हातमागावरील विणकाम उद्योगासाठी प्रसिद्ध होती. बडोद्यातील हातमागावर तयार होणाऱ्या माहेश्वरी साडी, रेशमी धोती, नक्षीकाम केलेली कपडे या वस्तूंना भारतभर प्रसिद्धी होती. परंतु कालौघात हा उद्योग मोडकळीला आला. हा उद्योग अस्तंगत होण्याला व्यावसायिक स्पर्धेबरोबरच हातमाग चालवण्यासाठी आवश्यक ऊर्जेचा अभाव, नावीन्याची कमतरता आणि बाजारपेठेतील मागणीचे आकलन करण्यात येणारे अपयश ही कारणेदेखील कारणीभूत होती.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / ३१