पान:महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



उद्योग उभा करण्यासाठी लागणारे भांडवल बडोदा बँकेकडून सहजपणे सवलतीत उपलब्ध होऊ लागले. बडोदा बँकेने आपले कार्यक्षेत्र संस्थानाबाहेर विस्तारले. बडोदा बँकेच्या एकूण पंधरा शाखांपैकी बॉम्बे, सुरत, अहमदाबाद आणि भावनगर या चार शाखा बडोद्याबाहेर होत्या.
 बडोदा बँकेच्या सचोटीपूर्ण कारभारामुळे बँकेची आर्थिक स्थिती सातत्याने सुधारत गेली. १९२९ मध्ये बडोदा बँकेचे भाग भांडवल ३० लाख रु. पर्यंत पोहोचले तर बँकेचा राखीव निधी २३ लाख ५० हजार रु. होता. या मजबूत आर्थिक स्थितीच्या आधारे बडोदा बँकेकडून बडोद्यातील केंद्रीय सहकारी बँकेलादेखील आर्थिक मदत पुरविली जात होती. केंद्रीय सहकारी बँका बडोद्यातील विविध सहकारी संस्थांना अर्थसाहाय्य करत होत्या. बडोदा संस्थानात बँक ऑफ बडोदाने सर्वप्रथम धनादेशाची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचप्रमाणे बँकेतील बचत खात्यांना प्रोत्साहन देऊन जनतेमध्ये बचतीची सवय रुजवण्याचा प्रयत्न केला.

 बडोदा सरकारकडून सातत्याने करण्यात आलेल्या आर्थिक मदतीच्या साहाय्याने बडोदा बँकेची प्रगती होत गेली. बँक ऑफ बडोदाने संस्थानातील परकीय व्यवसायांच्या नियमनात महत्त्वाची भूमिका बजावली. १९०८ मध्ये सयाजीरावांनी स्थापन केलेली ही भारतीय संस्थानातील पहिली सहकारी बँक आज ११२ वर्षानंतरही अत्यंत कार्यक्षमपणे कार्यरत आहे.

महाराजा सयाजीराव आणि उद्योग विकास / २५